कळे (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून १० हजार रुपये द्या, आशा व गतप्रवर्तक यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, शेतकरी व कामगार कायदे रद्द करा, अशी मागणी करत लाल बावटा बांधकाम कामगार संघटना व अखिल भारतीय किसान सभेने कळे येथील दस्तुरी चौक परिसरात आज (सोमवार) आंदोलन केले. वंचित शेतकरी संघटनेनेही आंदोलनाला उपस्थिती लावून निषेध व्यक्त करत जाहीर पाठिंबा दिला. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २२ जानेवारीला झालेल्या चर्चेच्या फेरीनंतर केंद्र सरकारने पुन्हा चर्चा करायला नकार दिला आहे. उलट बळाचा वापर करून आंदोलन हिंसक पद्धतीने मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतमालाला हमीभाव, इंधनाचे दर निम्मे करा, उसाला एकरकमी एफआरपी, बांधकाम कामगारांना घरासाठी पाच लाख रुपये अर्थसहाय्य, त्यांना पेन्शन लागू करणे, मेडिक्लेम योजना सुरू करा, बोगस नोंदीतून लाभ घेतलेल्या कामगारांची चौकशी करून मिळवलेल्या लाभाची वसुली करणे, अशा मागण्यांचे निवेदन दिले.

सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

यावेळी पन्हाळा-गगनबावडा अध्यक्ष भगवान घोरपडे, सुरेखा तिसंगीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कॉम्रेड राजेंद्र खांबे, संतोष जाधव, संजय सुतार, भिकाजी कुंभार, रंगराव मोळे, संगीता पाटील, राणी यादव, विमल अतिग्रे, मनीषा जोंधळेकर, हेमा कांबळे, सरदार पोवार, सागर भोसले, संजय रावण, पिंटू कांबळे आदी उपस्थित होते.