कोल्हापूर (अविनाश सुतार) : जिल्ह्यात गोकुळ निवडणुकीची रंगत वाढू लागली असून नाट्यमय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. शाहूवाडीचे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर) यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत सत्ताधारी गटात घरवापसी केली. हा विरोधी गटाला धक्का मानला जात आहे. सत्यजित पाटलांचा महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय औटघटकेचा ठरला. यामागे कार्यकर्त्यांची आणि शिवसैनिकांची तीव्र नाराजी कारणीभूत ठरली. मात्र, विरोधी गटापासून फारकत घेण्यामागे अनेक कारणे आहेत.

जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष व शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा दिला होता. भाजपचा घटक पक्ष म्हणूनच ते कार्यरत आहेत. गोकुळ निवडणुकीत भाजप सत्ताधाऱ्यांसोबत राहील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विनय कोरेही सत्ताधाऱ्यांसोबत जातील, असा अंदाज होता. परंतु, कोरे यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याने सत्यजित पाटलांची मोठी गोची झाली. आ. कोरे यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देणारे शाहूवाडीतील काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड आणि पन्हाळ्यातील अमर पाटील यांना गोकुळची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

या दोघांना विरोधी आघाडीतून उमेदवारी मिळत असेल, तर त्यांच्यासोबत का जावे, असा नाराजीचा सूर शाहूवाडी आणि पन्हाळ्यातील शिवसैनिकांतून उमटू लागला. शिवसेनेकडे ७० टक्के ठराव आहेत. ही ताकद पाहता याचा फायदा विरोधकांच्या उमेदवारांना होण्याची दाट शक्यता आहे. पन्हाळ्यातून गोकुळचे विद्यमान संचालक विश्वास जाधव सत्ताधारी गटात राहणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांचे पुत्र चेतन नरके यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाचे पारडे जड होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांना शह देण्याची हीच संधी माणून माजी आ. पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसोबत कायम राहावे, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली.

आ. विनय कोरे विरोधी आघाडीकडून दोन जागा पदरात पाडून आगामी विधानसभेचा मार्ग सुकर करण्याच्या प्रयत्नात आहेत. विधानसभा निवडणुकीत विरोधात जाणाऱ्या कर्णसिंह गायकवाड आणि अमर पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यामुळेच कार्यकर्त्यांना रूचला नाही. विरोधी आघाडीबरोबर गेल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत अडचणीचे ठरू शकते, अशी भीती शिवसैनिकांमधून व्यक्त होऊ लागली. तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आ. पी. एन. पाटील यांनी थेट सरूड गाठले आणि सत्यजित पाटील यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवले. परिणामी, कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि तीव्र भावना लक्षात घेऊन सत्यजित पाटील यांनी अखेर घरवापसी करण्याचा निर्णय जाहीर केला.