कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र, केरळ राज्यामध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्ण वाढत असल्याने कर्नाटक शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास कर्नाटकात प्रवेश देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानुसार कर्नाटक शासनाच्या पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी येथून प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना सोमवार (ता. २२) पासून परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातून येणाऱ्या मार्गावर कोगनोळी, अथणी, निपाणी, बोरगाव, कागवाड येथे चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. वाहनांची कसून चौकशी व तपासणी करण्यात येत आहे. सर्वत्र पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. शेजारील महाराष्ट्र राज्यांमध्ये वाढत असलेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोगनोळीसह अन्य मार्गावरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना मज्जाव केला आहे.
जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांचा ताफा चेकपोस्टवर तैनात करण्यात आला आहे. हे कर्मचारी याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांकडून प्रमाणपत्राची विचारणा करत आहेत. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनधारकांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यास मज्जाव घालून परत महाराष्ट्रात पाठवून देत आहेत. अथणी-जत, बोरगाव-इचलकरंजी,निपाणी-मुरगूड बेळगाव जिल्हा पोलिसांकडून कोगनोळी-निपाणी,कागवाड-मिरज,येथे चेकपोस्ट सुरू केले आहेत. तेथे महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची व वाहनांची तपासणी सुरू आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत आहे‌. शिवाय आरटीपीसीआर रिपोर्ट पाहीजे नसल्यास प्रवेश नाही.