आजरा (प्रतिनिधी) : शिरसंगी (ता.आजरा) येथील म्हारकी नावाच्या शेतातील ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने सुमारे ४० एकरातील ऊस जळून खाक झाला. आज (बुधवारी) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत २५ शेतकर्‍यांचा जवळपास ४५०  टन ऊस जळून अंदाजे सुमारे १५ लाखांवर नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नागोजी आप्पा कांबळे यांच्या शेतात बाबूंचे बेट असून त्या ठिकाणाहून महावितरणच्या विद्युत वाहक तारा गेल्या आहेत. या ठिकाणी विद्युत तारांचे घर्षण होऊन सुरुवातीला बांबूच्या बेटाला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग काही क्षणातच  उसाला लागली. भर दुपारी उन्हात उसाला आग लागल्याने आगीचे लोट दूरवर पसरत गेले. उसाचे फड एकमेकाला लागून असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. पेटत्या उसाचा आवाज व धुराचे लोट पाहून फडात काम करणारे शेतकरी घाबरुन शेतातून बाहेर पडले. याशिवाय शेतकर्‍यांनी शेतीच्या पाण्याकरिता घातलेल्या ४० पाईपांचेही आगीत नुकसान झाले.

परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. यावेळी जळीत उसाचा तत्काळ पंचनामा होऊन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकर्‍यांकडून मागणी करण्यात आली आहे.