नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. आज (शनिवार) त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. बुटा सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

बुटा सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री यासह बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. ते काँग्रेसच्या दिग्गज दलित नेत्यांपैकी एक होते. ते ८ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. सुमारे तीन महिन्यांपूर्वीच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात कुटुंबातील दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग हे चार वेळा जलोरमधून खासदार राहिले आहेत. राज्यभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.