मुंबई (प्रतिनिधी) : संचालकांचा मनमानी कारभार आणि त्यांनी केलेला सुमारे ३१० कोटींचा अपहार यामुळे अडचणीत आलेल्या कराड जनता सहकार बँकेचा परवाना रद्द करण्याची कारवाई रिझर्व्ह बँकेने केली आहे. आज (मंगळवार) याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. तसेच हा आदेश आल्यानंतर सहकार आयुक्तांनी बँक अवसायानात गेल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सभासद आणि ठेवीदारांमध्ये गोंधळ उडाला असून ते हवालदिल झाले आहेत.

या बँकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर,  पुणे,  मुंबई जिल्ह्यात असणाऱ्या एकूण २९ शाखांमध्ये ३२ हजार सभासद आहेत. या बँकेच्या संचालकांवर २०१७ साली ३१० कोटी अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर ६ ऑगस्ट २०१९ रोजी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधांनंतर कराड जनता सहकारी बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. बँकेबाबत अनेक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्यानंतर आज रिझर्व्ह बँकेने ही बँकिंग परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या आदेशानुसार बँकेतील ठेवीदारांचे ५ लाखांपर्यंतचे पैसे परत करण्यात येणार आहे. मात्र या प्रक्रियेला आणखी तीन महिने लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान बँकेच्या विस्तारित कक्षांसह एकूण २९ शाखांमधील कामकाज या काळात बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे या सर्व सभासदांना आणि ठेवीदारांना मोठा झटका बसला आहे.