कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेल्या आठवड्यात महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस पथकाकडून ४ हजार १७५ जणांकडून ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, हॅण्डग्लोज  वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबद्दल गेल्या आठवड्यात म्हणजे  दिनांक ११ ते १७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत  महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून ४ हजार १७५ जणांकडून ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, हा उद्देश असल्याचेही आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या.

यामध्ये दि. ११ नोव्हेंबरला ६७० जणांकडून ७८ हजार ६००,  दि. १२ नोव्हेंबरला ५९८ जणांकडून ६६ हजार ३००, दि. १३  नोव्हेंबरला ५३० जणांकडून  ६५ हजार ३००, दि. १४ नोव्हेंबरला ४३७ जणांकडून ४९ हजार १००, दि. १५ नोव्हेंबरला ७०५ जणांकडून ७५ हजार १००, दि. १६ नोव्हेंबरला ७३५ जणांकडून ७३ हजार १०० आणि दि. १७ नोव्हेंबरला ५०० जणांकडून ५५ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.