कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका खोलीत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून 40 किलो अफू आणि एक किलो गांजासह तिघांना ताब्यात घेतले आहे. या अमली पदार्थाची एकूण किंमत 5 लाख 21 हजार 400 रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थांचा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावर पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गायकवाड पेट्रोल पंपाच्या शेजारी एका खोलीत अफू बोंडांचा साठा करून त्याची पावडर तयार करतात. तसेच गांजा विक्रीसाठी साठा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. यानुसार या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता तब्बल 40 किलो 4 ग्रॅम वजनाचा अफू आणि 1 किलो 195 ग्रॅम वजनाची बारीक पावडर तसेच 1 किलो गांजा असा एकूण 5 लाख 21 हजार 400 रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

यावेळी या ठिकाणी असलेल्या पेठवडगाव येथील मनीष मोहनराम, मोहन चोकलू चव्हाण आणि अमीर सय्यद जमादार या तिघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांवर पेटवडगाव पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, विजय गुरखे, विलास किरोळकर, नामदेव यादव, सचिन देसाई, महेश गवळी, अमित सर्जे, सागर चौगुले, प्रवीण पाटील, विनोद कांबळे, महादेव कुराडे, सुशील पाटील, यांनी सहभाग घेतला.