कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ऊस दरावरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम केला आहे. यामुळे दिवसभरात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दहा – दहा किलो मिटरच्या रांगा लागल्याचे चित्र होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदारांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा स्वाभिमानी सोबत चर्चा झाली असून. या चर्चाला यश आलं आहे.
याबाबत स्वाभिमानी ने परिपत्रक काढत म्हटलं आहे की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगाम सन 2022-23 मधील शेतक-यांना मिळालेल्या ऊसाच्या दराविषयी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांची आंदालने सुरु झाली होती. त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात येत आहे की, मागील हंगामामध्ये शेतक-यांना ऊसाचा दर प्रती टन रुपये 3,000 पेक्षा कमी ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे त्यांनी मागील हंगामातील शेतक-यांना रुपये 100/- अतिरिक्त प्रती टन द्यावे व ज्यांनी रुपये 3,000/- पेक्षा जास्त दर प्रती टन दिलेला आहे.
त्या साखर कारखान्यांनी रुपये 50/- प्रतीटन अतिरिक्त शेतक-यांना द्यावेत. याबाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा व पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी मा. पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांना दिलेले आहे. तसेच, दोन महिन्यानंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतक-यांना साखर कारखान्यांनी देण्याची आहे.
तरी सर्व साखर कारखान्यांनी याप्रमाणे आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्यावे असे आवाहन सर्व साखर कारखान्यांना मा. पालकमंत्री यांनी केले आहे. या आश्वासनाप्रमाणे जिल्ह्यात चालू असणारे मागील हंगामासाठी वाढीव ऊसाचे दर मागणी विषयीचे आंदोलन व आजचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.