गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुगळी येथे घराशेजारील गोबरगॅसच्या टाकीत पडल्याने गुदमरून एका तरुणाचा मृत्यू झाला. संतोष दुंडाप्पा आमिनभावी (वय २८) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आज (शनिवार) दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक माहितीनुसार, संतोष हा पत्नी अक्षतासह घराशेजारील गोबरगॅस परिसरात स्वच्छता करीत होता. त्यावेळी अचानक तोल जाऊन तो शेणाच्या टाकीत पडला. अक्षता हिने आरडाओरडा करीत ग्रामस्थांना जमवून त्यांच्या मदतीने संतोष यास बाहेर काढले. मात्र शेणात गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मागे पत्नी अक्षतासह आई, वडील आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे.