कोल्हापूर/प्रतिनिधी : महायुतीतील हातकणंगलेच्या जागेचा तिढा सुटला आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत ८ जणांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपकडे तिकीटासाठी प्रयत्न करून देखील अपयश आल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांचे पूत्र व माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे शिवसेना उध्दव ठाकरे गटाची मशाल हाती घेणार असल्याचे समजत आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आवाडे यांची भेट घेवून चर्चा केली. त्यामुळे येत्या दोन दिवसांत आवाडे हे उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महायुतीकडून राहूल आवाडे इच्छुक होते. त्यासाठी आमदार आवाडे यांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र खासदार धैर्यशील माने यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे नाराज झालेल्या राहूल आवाडे यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत.

हातकणंगले मतदार संघ ठाकरे गटाच्या वाट्याला आला आहे. याठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत येण्यास नकार दिल्यांनतर, बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी मशाल चिन्हावर उमेदवार देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने-शेट्टी-आवाडे अशी लढत जवळपास निश्चित झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आवाडे यांची भेट घेवून उमेदवारीवर चर्चा केली. दोन दिवसांत आवाडे पितापूत्र उध्दव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आवाडे जर निवडणूक रिंगणात आल्यास तिरंगी लढत होवू शकते. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डी. सी. पाटील यांचेही नाव चर्चेत आले आहे. दोन दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मागील लोकसभेप्रमाणे यंदा वंचितच्या उमेदवारीचा फटका इतर उमेदवारांना बसणार आहे.