शिरोळ (प्रतिनिधी) : कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाला चंदुर गावाकडील बाजूने टाकलेल्या भरावामुळे टाकळी भागातील शेतात नदीचे पाणी घुसले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे   सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

यावेळी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज (शु्क्रवार) सैनिक टाकळी येथे जाऊन या ठिकाणी झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कर्नाटकचे आ. गणेश हुक्केरीही उपस्थित होते.

सैनिक टाकळी येथे कृष्णा नदीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला दळणवळणासाठी पुलावर काम सुरु आहे. तिथे कर्नाटकच्या हद्दीपासून दहा गाळ्यांपर्यंत मुरमी बांध घातला आहे. तर टाकळीकडील दोन गाळे रिकामे आहेत. दरम्यान, झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा, दुधगंगा आणि कृष्णा या नद्यांचे एकत्रीत पाणी नदीपात्रात आल्याने नदीपात्राच्या लगतच्या टाकळी हद्दीतील शेतकऱ्यांची सुमारे पाच ते सहा एकर शेती वाहून गेली आहे. तसेच शेतकऱ्यांचे विद्युत पंप, पाईप, केबल नदीपात्रात वाहून गेले आहेत.

यावेळी आ. गणेश हुक्केरी यांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटक शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना भेटून मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे ना. यड्रावकर यांनी सांगितले.

यावेळी शिरोळच्या तहसीलदार अर्पणा मोरे-धुमाळ, शिरोळ पं. स. सभापती दिपाली परीट, टाकळीच्या सरपंच हर्षदा पाटील, हरिचंद्र पाटील,  रणजीत पाटील, उमेश पाटील, उपसरपंच श्रीधर भोसले, पोलीस पाटील सुनिता पाटील आदी उपस्थित होते.