कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट अचानकपणे उघडून अडकल्याने बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता भोगावती नदीच्या पात्रात सुमारे साडे सहा हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला होता. धरणातून सहा तासांत तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याला पाणीटंचाई जाणवणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला असताना पाटबंधारे विभागाने दिलासादायक माहिती दिली आहे. 

धरणात गतवर्षीपेक्षा अजूनही ०.२० टीएमसी पाणी अतिरिक्त आहे. त्यामुळे पाणी वाहून गेल्याने फार मोठे नुकसान होणार नाही. तसेच भविष्यात मोठी पाणीटंचाई जाणवणार नाही. मुळातच यावर्षी अवकाळी पाऊस डिसेंबरपर्यंत पडला आहे. त्यामुळे धरणात अतिरिक्त पाणीसाठा झाला होता. गेट उघडल्याने ०.२४ टीएमसी पाणी कमी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अतिरिक्त पाणी होते. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचे पाटबंधारे विभागातील सूत्रांनी सांगितले.

धरणात बुधवारी सकाळी ८ वाजता ६.९२ टीएमसी पाणीसाठा होता. परंतु गेट उघडून पाणी वाहून गेल्याने दुपारी हाच साठा ६.६८ इतका झाला. ०.२४ टीमएमसी म्हणजे १६६ एमसीएफटी पाणी वाहून गेले. गेल्या वर्षी याच महिन्यात धरणात ६.४८ टीएमसी पाणी शिल्लक होते. आता ते ६.६८ राहिले आहे. परिणामी  पाणीसाठ्यावर फार मोठा परिणाम झालेला नाही.

बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता धरणातील सर्व्हिस गेटची दुरुस्ती सुरू असताना अनावधानाने पाण्याचा मोठा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला होता. त्यानंतर जलसंपदा विभागाने तातडीने पावले उचलत दुपारी सव्वातीन वाजता धरणाचे गेट   बंद केले होते. तोपर्यंत १६६ एमसीएफटी पाणी धरणातून वाहून गेल्याने पाणीटंचाई जाणवणार का ? अशी चर्चा सुरू झाली होती.