कोल्हापूर (प्रतिनिधी) : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सुभाष पाटील हे बँकेचे कर्मचारी  असल्याने ते हजारो लोकांशी संपर्कात येत होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यातून त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याचा गोकुळच्या निवडणुकीचा काय संबंध ?, असा सवाल करून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या आरोपाला आज (रविवार) पत्रकार परिषदेत उत्तर दिले.   

डोणोली येथील सुभाष पाटील हे केडीसीसी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत शाखाधिकारी होते. तसेच ते गोकुळचे ठरावधारक आहेत. त्यांचा शनिवारी कोल्हापुरातील एका खासगी रूग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यावर काल माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्र्यांच्या गोकुळ निवडणूक घेण्याच्या  हट्टामुळेच पाटील यांचा बळी गेला, असा आरोप केला होता. यावर मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. याचबरोबर गोकुळच्या निवडणुकीचा प्रचार याआधी बऱ्यापैकी झाला आहे. बेळगांव, पंढरपूर तसेच देशात बाकीच्या ठिकाणी निवडणुका होत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत मतदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे ही निवडणूक घ्यायला काहीच अडचण नाही. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच ही निवड़णूक होत असून सत्ताधाऱ्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांची ‘ही’ धडपड सुरू आहे.

ना. मुश्रीफ म्हणाले की, महाडिक आणि पालकमंत्री यांच्या वादात मला पडायचे नव्हते. परंतु सुभाष पाटील हे केडीसीसी बँकेचे कर्मचारी असल्याने मला यावर बोलावे लागत आहे.  सत्ताधाऱ्यांना पराभव समोर दिसू लागला आहे. याच भीतीपोटी ते कोणतेही कारण पुढे करून आरोप करू लागले आहेत. पाटील यांच्या मृत्यूचा गोकुळच्या निवडणुकीशी काही संबंध नाही, या घटनेचा गोकुळ निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही, असेही मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले.