धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या-विमुक्त जाती जमातीच्या तालुकाध्यक्ष पदी म्हासुर्ली पैकी बाजारीचा धनगर वाडा येथील विठ्ठल सोनबा मलगुंडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. सोळांकुर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.
ए. वाय. पाटील म्हणाले, मलगुंडे यांनी या अगोदर राधानगरी तालुका धनगर समाज क्रांतिकारक संघटनेचे माजी युवा अध्यक्षपद यशस्वीपणे पार पडले आहे. त्यांच्या समाज कार्याची दखल घेऊन नियुक्ती केली आहे. यावेळी राजेंद्र पाटील, धोंडीराम मलगुंडे, तानाजी हुंबे, बाबुराव बाजारी, गंगाराम येडगे, तानाजी बाजारी, सयाजी मलगुंडे, कार्यकर्ते उपस्थित होते.