मुबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोली दौऱ्यावर असताना त्यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट दिली. या रुग्णालयात चाललेला भोंगळ कारभार तसेच जनसामान्यांना होणारा त्रास व जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधा बाबत मिळालेल्या तक्रारी याची गंभीर दखल घेत रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळताच उपस्थित अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, यांची कानउघाडणी करून आरोग्य सेवेबाबत असंवेदनशील पणाचा कळस गाठणाऱ्या सरकारला चांगले धारेवर धरले.

गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे. या रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार न मिळणे, प्रसूती रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणे, रात्रपाळी वरिष्ठ व अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिती, रुग्णालयातील लिफ्ट बंद असणे, फायर ऑडिट होऊन देखील योग्य खबरदारी घेतलेली नसणे, रुग्णालयातील रिक्त पदे व कोविड मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढणे अशा विविध गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.

तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांशी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असभ्यवर्तन यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक, अतिरिक्त शल्यचिकित्सक तसेच वैद्यकीय अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची चांगलीच कानउघडणी केली. सोबतच अग्निशमनाबाबत जी कामे रेंगाळलेली आहेत, याकरिता संबंधित विभागाच्या वरिष्ठांना खडेबोल सुनावले. व अग्निशमना संदर्भात ठप्प असलेली कामे त्वरित पूर्णत्वास आणण्याचे निर्देश दिले. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात एमआरआय, एनजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक अशा महत्त्वपूर्ण सुविधा नसल्याने गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेबाबत सरकारचे दुर्लक्षित धोरण कारणीभूत असून अशा दुर्गम भागातील रिक्त पदे भरणे हे आरोग्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतानाही केवळ टेंडर व त्यातील कमिशन खोरी यातच सरकार गुंतले असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देखील असून गडचिरोलीच्या आरोग्य सेवेला योग्य न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये याकरिता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करून जिल्ह्याच्या रक्त साठ्यात भर घालावी अशी विनंती देखील पोलीस विभागाला करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

याप्रसंगी प्रामुख्याने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. सतीश सोळुंके, आर एम ओ बाबराज धुर्वे, गडचिरोली काँग्रेसचे ज्येष्ठ अँड राम मेश्राम, किसान सेलचे वामनराव सावसाकडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, अनुसूचित जाती.सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, चंद्रपूर जिल्हा परिषद माजी सभापती दिनेश पाटील चिटनुरवार आदि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.