पीलीभीत : उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजप खासदार वरुण गांधी चर्चेत आहेत. पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून वरूण गांधींचे तिकीट कापून जितीन प्रसाद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल आहे. पीलीभीत मतदारसंघातून वरुण गांधी निवडून आले होते. त्यामुळे ही जागा पुन्हा त्यांना मिळेल, असा विश्वास त्यांना होता. पण आता त्यांना तिकीट न मिळाल्याने वरुण गांधी यांचे पुढचे पाऊल काय असणार ? ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट कापल्यानंतर कॉंग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधीर रंजन चौधरी यांच्याकडून वरुण गांधी यांना कॉंग्रेसमध्ये सहभागी होण्याची ऑफरदेखील देण्यात आली आहे.वरुण गांधी हे गांधी परिवाराशी संबंधित असल्याने भारतीय जनता पार्टीने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले नाही असा आरोप चौधरी यांनी केला आहे. निवर्तमान लोकसभेमध्ये बोलताना कॉंग्रेस नेते चौधरी म्हणाले, वरुण गांधी दबंग नेता असून त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांचा गांधी परिवाराशी संबंध असल्याने भाजपने लोकसभेचे तिकीट नाकारले आहे. वरुण गांधी हे कॉंग्रेसमध्ये आले तर आम्हाला खूप आनंद होईल‘, असेही चौधरी यावेळी म्हणाले. वरुण आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे दोघे चुलत बंधू आहेत.