कोल्हापूर (प्रतिनिधी) : समाजातील गोरगरीब व वंचितांना मदतीचा हात देऊन सातत्याने समाजाभिमुख कार्य अनेक घटक करतात. याच भावनेतून करवीर तालुक्यातील पाचगाव येथील वंदना विठ्ठल साळुंखे यांनी आपला तरुण मुलगा स्वप्नील याच्या मृत्यूनंतर त्याच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त रस्त्यावर बसून भिक्षा मागणाऱ्या भिक्षुकांना पावसापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने छत्रीदान करण्याचा उपक्रम राबवला.

पाचगाव येथील वंदना साळुंखे ह्या नेहमी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात अग्रेसर असतात. आपला तरुण मुलगा स्वप्नील याच्या स्मरणार्थ वंदना साळुंखे ह्या गेली अकरा वर्षे आपल्या कुटुंबासमवेत गोरगरीब, अनाथ यांना छोट्याशा मदतीचा हात लावत असतात. आज त्यांनी रस्त्यावर बसून भिक्षा मागणाऱ्यांची गरज ओळखून पावसापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने भिक्षेकऱ्यांना छत्रीदान केली. वंदना साळुंखे आणि त्यांच्या मैत्रीणी मनिषा आसबे, उर्मिला घाडगे, शर्वरी पाटोळे, छाया मतीवडे आणि आवळे ताई यांच्या मदतीनं हा छत्रीदानचा उपक्रम राबवला. समाजातील निराधारांना मदतीची ही भावना अनुकरणीय असल्याच मत श्रीमती आवळे यांनी व्यक्त केले.