तुळजापूर (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही. आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये असा सल्ला उद्धव ठाकरे यांना मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.  तसेच नांदगावकर यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टीका देखील केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला गेले त्यावेळी ते बोलत होते. 

‘राज्यसभेच्या निकालापासून शिवसेना आत्मचिंतन करून धडा घेईल ही अपेक्षा आहे आणि विधान परिषदेत योग्य ते घडेल.’ अशी आशाही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे. पत्रकारांनी शिवसेना-मनसे युतीच्या विषयाबाबत देखील त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा बाळा नांदगावकर यांनी सेना-मनसे विषय इतिहास जमा झाल्याचे म्हणत याबाबत अधिक भाष्य करणे टाळले.

आगामी महानगरपालिका व इतर निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे. मनसे आपली लढाई स्वबळावर लढाई लढणार आणि निवडून येणारं असल्याचे भाकीत त्यांनी केले. बाळा नांदगावकर यांनी आगामी निवडणुकीत स्वबळाची घोषणा केली. आम्ही आधीही एकला चालोरे होते, आज ही एकला चलो रे आहोत. कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुका लढवाव्या असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

जय-पराजय सुरूच असतो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणुकीत काही वेळ जिंकणे असते, तर काही वेळा हरणे असते. ज्या वेळेस एखादा उमेदवार विजयी होतो. त्यावेळेस तोच फॉर्म्युला योग्य असे सर्वांना वाटते आणि जेव्हा अपयश येते त्यावेळेस लोकांना यांचे काहीतरी नियोजन चुकले असे वाटते. मात्र, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चनचे चित्रपट ही कधी कधी अपयशी ठरतात. मात्र, त्यानंतरही ही अमिताभ बच्चन हा बच्चनच असतो असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यसभा निकालावर बोलताना, संजय राऊत थोडक्यात वाचले, नाहीतर उलटे झाले असते अशी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते. संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना आणखी दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.