कागल (प्रतिनिधी) : गोरगरीब सर्वसामान्य जनता हीच माझी खरी ताकद आहे. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठीच आयुष्य खर्ची घालणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जोपर्यंत या जनतेचे आशीर्वाद पाठबळ आणि परमेश्वराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत मला कसलाही धक्कासुद्धा लागणार नाही, असेही ते म्हणाले.

कागलमधील बहुउद्देशीय हॉलमध्ये तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या २०० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने होते.

ना. मुश्रीफ पुढे म्हणाले की, विशेष सहाय्य मंत्री म्हणून काम करीत असताना ही संजय गांधी निराधार योजना संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत प्रभावीपणे राबविली. समाजातील विधवा, परित्यक्त्या, अंध, दिव्यांग, मंतीमंद  आणि डोंगराएवढे दुःख असलेले ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक माझ्या डोळ्यासमोर होते.

आमदार असावा मुश्रीफांसारखा….

आणूर येथील ज्येष्ठ नागरिक व योजनेचे लाभार्थी शंकर नरके म्हणाले की, गोरगरीब जनतेची काळजी वाहणारा आमदार असावा, तर हसन मुश्रीफ यांच्यासारखा आणि त्यांच्या पाठीशी हिमालयासारखे खंबीर राहणारी जनता असावी, तर कागलच्या जनतेसारखी.

यावेळी व्यासपीठावर तहसीलदार शिल्पा ठोकडे, सदाशिव तुकान, बाळासाहेब दाईंगडे, राजेंद्र आमते, सातापा कांबळे, शशिकांत खोत, संजय चितारी, विकास पाटील, प्रवीण सोनुले, विठ्ठल जाधव पैलवान रविंद्र पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

समिती सदस्य सदाशिव तुकान यांनी स्वागत केले. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी प्रास्ताविक केले. निशांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बस्तवडेचे माजी सरपंच साताप्पा कांबळे यांनी आभार मानले.