कळे (प्रतिनिधी) : कोल्हापूर- गगनबावडा रस्त्यावर कळंबे येथे कार आणि एसटी बसच्या झालेल्या धडकेत कारमधील तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी ९.३० वाजता झाला. या अपघातात करण दीपक माळवे (वय २७), संजय दिनकर माळवे (वय ४४), आक्काताई दिनकर माळवे (वय ६५ सर्व रा. विक्रमनगर, कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमनगर येथील माळवे कुटुंबीय कळे येथील आपल्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी कारमधून (एमएच ०९ बीडब्ल्यू ४१४१) निघाले होते. या कारमधून सात जण प्रवास करत होते. दरम्यान, कळंबे येथे कार आणि कणकणवली आगाराच्या एसटी बसची जोरदार धडक झाली. यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. जखमींना सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.