कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध संघाची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विरोधकांच्या गोंधळामुळे आटोपती घेण्यात आली. कर्मचाऱ्यांना पुढे बसविल्याने आणि सीसीटीव्ही लावण्यावर आक्षेप घेत विरोधकांनी सभेच्या सुरूवातीला मोठा गोंधळ घातला. तर गेल्या वेळीची सभा झाली नसल्याचा आक्षेप घेत विरोधकांनी त्या सभेचे  इतिवृत्त वाचण्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे सत्तारूढ आणि विरोधक सदस्य आमनेसामने आल्याने मोठा गदारोळ उडाला. त्यातच सभा आटोपती घेण्यात आली. सभेत विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती सभेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांनी दिली. सभेत गोंधळच घालायचा या उद्देशाने विरोधक आल्याचा आरोपही त्यांनी केला.

कागल – हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील संघाच्या पशुखाद्य कारखान्याच्या आवारात यंदाची सभा घेण्यात आली. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे प्रकृतीच्या कारणास्तव सभेला गैरहजर असल्यामुळे ज्येष्ठ संचालक अरूण नरके सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संघाचे कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर यांनी प्रास्ताविक केले. घाणेकर यांनी सभेचा वृतांत वाचून दाखविला. यावेळी सर्व विषय वाचून दाखवा, अशी मागणी सभासदांतून करण्यात आली. वाचन सुरू झाल्यानंतर माईक देण्याची जोरदार मागणी सभासदांनी केली.