कुरुंदवाड (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून क्षारपडमुक्त शेती योजनेच्या एकूण खर्चाच्या ९० टक्के रक्कम शासन देणार आहे. १० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरायची आहे. ही भरण्याची ऐपत नसेल त्या शेतकऱ्याला ती रक्कम जिल्हा बँक किंवा बँकेतून उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. ते शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथे बोलत होते.

कवठेगुलंद येथे शिरोळ तालुक्यातील २७ गावांतील १३ हजार १०० एकर जमीन क्षारपडमुक्तीच्या पार्श्वभूमीवर जमिनीच्या सर्वेक्षणाच्या उद्घाटन ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालयाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रिया लांजेकर म्हणाल्या की, सांगली-कोल्हापूर या दोन जिल्ह्यात क्षारपड क्षेत्र सर्वात जास्त आहे. शेतीला सेंद्रिय खतांचा वापर न करता रासायनिक द्रव्यांचा वापर झाल्याने क्षारांचे प्रमाण वाढून जमिनीचा पोत खराब झाला आहे. जमीन सुधारणा करण्यासाठी क्षारपडमुक्तीसाठी शासनाने सर्व्हेक्षनाला सुरवात केली आहे. लवकरात लवकर शेती क्षारपडमुक्त करण्यासाठी शासनस्तरावरून सर्व प्रशासकीय यंत्रणा गतिमान करणार असल्याचे सांगितले.

यावेळी पं.स. सभापती दीपाली परीट, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, प्रकाश पाटील टाकवडेकर, मल्लाप्पा चौगुले, जयपाल कुंभोजे, शाबगोंड पाटील, भोला कागले, दादेपाशा पटेल, शफी पटेल, सचिन दानोळे, आनंदा कुमे आदी उपस्थित होते.