कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबतची माहिती घेत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाने घेतले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील या योजनेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेवून सर्व कागदपत्रांची पडताळणी करुन पात्र असणाऱ्यांनी दि. 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत, असे ही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी म्हटले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष खालीलप्रमाणे

विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच तो अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा.

या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्द व महानगरपालिकेच्या हददीपासून 5 कि.मी. च्या परिसरात असलेल्या महाविद्यालय/ शैक्षणिक संस्था या ठिकाणी प्रवेशित असणाऱ्या व भाडयाने राहत असणाऱ्या (कुटुंबापासून स्वतंत्र) विद्यार्थ्यांसाठी सदरच्या योजनेचा लाभ अनुज्ञेय आहे.