पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९६.०६ टक्के आहे. परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा १.०९  टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. 

दहावी परीक्षेसाठी ९ विभागातून एकूण १५ लाख ८४ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १५ लाख २१ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात एकूण १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले, तर ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८३,०६० इतकी आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे.

कोकण विभागात सर्वाधिक ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के इतका लागला. २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती. यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती.

विभागानुसार निकाल : पुणे- ९६.९६, नागपूर- ९७,  औरंगाबाद- ९६.३३,  मुंबई- ९६.९४,  कोल्हापूर: ९८.५०, अमरावती- ९६.८१,  नाशिक- ९५.९०,  लातूर- ९७.२७,   कोकण- ९९.२७