पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बारामतीत नक्की परिवर्तन होणार आणि अब की बार सुनेत्रा ताई पवार खासदार, असे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण पाहत आहोत. बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडून दिले. मात्र अबकी बार सुनेत्रा ताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे. मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यासपीठावर आते मजबूत माणसं आहेत की, 10-12 लाख मते अगदी सहज मिळतील, आणि ते बरोबर आहे. हे लोक सुनेत्रा ताईंना दिल्लीला नक्कीच पाठवतील. आज आपण पाहतोय की बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण इथे पाहत आहे. आज खऱ्या अर्थाने बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.