मुंबई : एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो. आता या विद्यार्थ्यांना थेट शाळेत पास वितरीत करण्याची योजना आखली आहे. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी स्थानिक एसटी प्रशासनाकडून केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय रांगेत उभे राहून पास घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

एसटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासात 66 टक्के सवलत दिली जात असते. या पाससाठी केवळ 33 टक्के भरुन पास काढता येत असतो. तर विद्यार्थींना बारावी पर्यंत मोफत एसटी पास मिळत असतो. या विद्यार्थ्यांना आता एसटीने थेट शाळेत पास वितरीत करण्याची योजना आखली आहे. राज्यात एसटी महामंडळाच्या सध्या 16 हजार बसेस असून 87 हजार कर्मचारी सेवा देत आहेत. एसटी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीत प्रवास घडवित असते. या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम सरकार एसटी महामंडळाला परत करीत असते.

त्याचप्रमाणे सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जातात. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास काढावा लागतो. तर काही ठिकाणी ग्रुपने एसटी आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जातात.

पण या वर्षापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात 18 जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या आधी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी एसटीच्या आगार व्यवस्थापकांना पत्र द्याचं आहे. त्यात आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी द्याची आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.