कोलंबो : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देश सोडून मालदीवमध्ये पलायन केले आहे. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक गोंधळ घालत आहेत, तर हजारो लोकांचा मोर्चा संसद भवनाकडे कूच करत आहे. जनतेचा तीव्र विरोध पाहता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.

हजारो लोक संसद भवनाकडे कूच करत असल्याने ठिकठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्याचवेळी दोन गटांत आपापसात भिडल्याने त्यात १२ जण जखमी झाले आहेत.

श्रीलंकेच्या हवाई दलाच्या माध्यम संचालकांनी सांगितले की, राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांना पत्नी आणि दोन अंगरक्षकांसहीत मालदीवमध्ये प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन, सीमाशुल्क आणि इतर कायद्यांबाबत संरक्षण मंत्रालयाकडून संपूर्ण परवानगी देण्यात आली होती. बुधवारी सकाळी त्यांना हवाई दलाचे विमान उपलब्ध करून देण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपक्षे काही नौदल केंद्रात वेळ घालवत असल्याची बातमी समोर होते. २० दशलक्ष लोकसंख्या असलेला श्रीलंका सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लाखो लोक अन्न, औषधे, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी धडपडत आहेत.

श्रीलंकेचा मुख्य विरोधी पक्ष समागी जाना बालवेगयाचे (एसजेबी) प्रमुख सजित प्रेमदासा यांची श्रीलंकेचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एसजेबी’ने सोमवारी निर्विवादपणे प्रेमदास यांना अंतरिम अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केले. श्रीलंकेत २० जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत आणि संसदेचे अधिवेशन १५ जुलै रोजी होणार आहे.