कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी दिल्याने भाजप आणि शिंदे यांच्यासोबत असणारे आमदारही नाराज आहेत. यातच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी करत निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. तर कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. पण आवाडे निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम रहीले आहेत. त्यामुळे प्रकाश आवाडे यांची उमेदवारी धैर्यशील माने यांच्यासाठी मोठा अडथला असणार आहे. त्यामुळे तीन दिवसापूर्वी धैर्यशील माने यांच्यासाठी पहाटेपर्यंत जोडण्याकेल्यानंतर आता पुन्हा एकदा आज मुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत. आजही ते प्रकाश आवाडे यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्ये आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहेत. कोल्हापुरात महायुतीकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री प्रकाश आवाडे यांची मनधरणी करणार आहेत. त्यामुळे आवडे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुख्यमंत्र्यांची चर्चा निष्फळ, आवडे भूमिकेवर ठाम
दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत होत असल्याने धैर्यशील माने धर्मसंकटात सापडले आहेत. त्यामुळे माने यांच्या विरोधातील धार कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले आहेत. तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये येऊन त्यांनी आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेत प्रचारामध्ये सक्रिय होण्याचे आवाहन केलं होतं. या मतदारसंघातून बंडखोरी करत असलेल्या अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र, या भेटीमध्ये कोणताही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या 45 मिनिटांच्या चर्चेनंतरही बंडखोरीचा निर्णय कायम ठेवला होता.

आवाडे उमेदवारी मागे घेणार ?
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आज प्रकाश आवाडे यांची भेट घेणार आहेत. कोल्हापुरातील आवाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार असून या भेटीमध्ये पुन्हा एकदा ते प्रकाश आवाडेंची मनधरणी करणार आहेत. त्यामुळे प्रकाश आवाडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द मानून आपली उमेदवारी मागे घेणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. आवाडे हे विधानसभेचा शब्द पक्का करण्यासाठी बंडखोर करून आपलं उपद्रव मूल्य दाखवून देत आहेत का? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

हातकणंगलेमध्ये पंचरंगी लढत
प्रकाश आवाडे माने यांच्या विरोधात रिंगणात उतरल्यास इचलकरंजीमधील मत विभागणीचा मोठा फटका माने यांना बसणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आवाडे यांचं बंड थंड करण्यासाठी मुख्यमंत्री गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, आवाडे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये राहुल आवाडे प्रयत्नशील होते. मात्र, थेट प्रकाश आवाडे यांनीच उमेदवारीची घोषणा केल्याने हातकलंगलेमध्ये आता पंचरंगी लढत होत आहे.
या लढतीमध्ये कोणाचा विजय होणार याबाबत आता अनेक अडाखे बांधले जात असले, तरी अंतिम निकाल हा चार जून रोजी समजणार आहे. या मतदारसंघातून राजू शेट्टी रिंगणात आहेत. वंचितकडून डीसी पाटील रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी दिल्याने लढत आणखी रंगतदार झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोल्हापूरच्या तुलनेत हातकलंगलेमध्ये राजकीय भाऊगर्दी झाल्याने कोण कोणाचा घात करणार? याचे उत्तर आता चार जून रोजी मिळणार आहे.