मुंबई ( वृत्तसंस्था ) मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे यांनी सकल मराठा समाजाची वज्रमुठ एक करत राज्य सरकारला जेरीस आणले आहे. जरांगे यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता मराठा आरक्षणासाठी 15 फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. तसेच नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. या बरोबरच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.

सध्या राज्य सरकार अधिवेशन घेत मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अध्यादेश काढणार आहे. दरम्यान मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.