टोप ( प्रतिनिधी ) शाळांचे खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट सरकारचा चालू आहे. दिवसा शाळा आणि रात्री तेथे नको ते उद्योग उद्योगपती करतील. शाळांचे खाजगीकरण म्हणजे भविष्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.

असे मत शिवसेना उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केले. अंबप, मनपाडळे (ता.हातकणंगले) येथे आयोजित होऊ द्या चर्चा अभियानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव होते.

पुढे त्या म्हणाल्या की, हे सरकार भावनिक, धार्मिक राजकारण करून सत्तेवर आलेल्या सरकारने नुसतच लोकांना फसवण्याचे काम केले आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, खते- बियाणे यांची सर्वत्र वानवा आहे. त्यामुळे होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून सरकारला जनतेच्या साक्षीने जाब विचारण्यासाठी आपण इथे उपस्थित असल्याची भावना उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी मांडली.

यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, म्हणाले की गोरगरीब जनतेच्या खिशातून वेगवेगळ्या प्रकारे पैसे काढून घेण्याचे उद्योग या सरकारच्या आहेत. यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, अंबपवाडी शाखाध्यक्ष सागर चोपडे, सागर डोंगरे, संपतराव शिंदे यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.