डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजा माने तसेच कार्यकारणीचे सदस्य प्रमोद मोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी येत्या काळात पत्रकारितेची ताकद डिजिटल माध्यमेच दाखवतील असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.

या वेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना राजा माने म्हणाले की, विस्कळीत माध्यमांना संघटीत करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेत सुमारे 5,000 वेगळ्या माध्यमातील संस्था संलग्न झाल्या असून यंदा देशातील माध्यमांनी 70,000 कोटी पैकी 27,000 हजार कोटी जाहिरात व्यवसाय हा डिजिटल माध्यमांनी केला असून भविष्यात हा आकडा 40,000 हजार कोटीपर्यंत जाईल त्यामुळे ”येत्या काळात पत्रकारीतेची ताकद डिजिटल माध्यमेच दाखवतील असा विश्वास माने यांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम दसरा चौक कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथील सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाईव्ह मराठीचे वैभव प्रधान यांनी केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डिजिटल मिडिया संघटना कार्यकारणीचे सदस्य प्रमोद मोरे म्हणाले की, डिजिटल मीडिया हा कमी कालावधीत वेगाने उभा राहातो आहे. हे माध्यम अद्याप बाल्यावस्थेत आहे. तरी देखील मुख्य प्रवाहातील माध्यमे डिजिटल मिडियाची तुलना अनेक शतकांची परंपरा असणाऱ्या प्रिंट अथवा तत्सम माध्यमांशी करत आहेत. याबाबात मोरे यांनी खंत व्यक्त केली. मात्र येत्या काळात याच डिजिटल मीडियाला उज्वल भविष्य आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे समाजाने काही काळ डिजिटल मीडियाच्या मागं उभा राहण्याची गरज असल्याचे मोरे यांनी नमुद केलं.

या कार्यक्रमादरम्यान राजा माने यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आरोग्य दिनदर्शिका 2023 चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकेत जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकिय, खासगी, सामाजिक संस्था तसेच रुग्णलयांचे संपर्क क्रमांक आहेत. याचा उपयोग सर्वांना होणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डायरेक्टर डॉक्टर रेश्मा पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विजय भोजे यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर रेश्मा पवार आणि कॉंग्रेस पक्षातील सहकारी प्रदीप झांबरे यांना समर्पित केला.

यावेळी मिडिया कंट्रोलचे पत्रकार अजय शिंगे यांना पत्रकारीतेतील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले, यावेळी लाईव्ह २४ तास न्यूज नेटवर्कचे पत्रकार नवाब शेख, माझा महाराष्ट्राचे छायाचित्रकार नाज अत्तार, लाईव्ह मराठीचे छायाचित्रकार नरेंद्र देसाई या सर्वांचा डिजिटल क्षेत्रात पत्रकारितेतील भरीव व अमूल्य योगदानाबद्दल गौरवण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना जीवन सन्मानाने गौरवण्यात आले. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ माध्यमविद्या व जनसंवाद अधिविभागाचे माजी विभाग प्रमुख रत्नाकर पंडित, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे ( अब्दुललाट) राजेश नाईक, सुहास पाटील, शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर, भाऊसाहेब पास्के यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.