कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी साऱ्या देशाला समानतेचा मानवतेचा संदेश देऊन सामाजिक समता आणण्याचे काम केले. सगळा जातिभेद तोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि बहुजन समाज एकच असल्याचे सिद्ध केले, असे  प्रतिपादन विचारवंत डॉ. टी. एस. पाटील यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात ३१ ऑगस्ट १९५३ रोजी भटक्या विमुक्त जाती जमातींना स्वातंत्र्य मिळाले. यानिमित्ताने दलित मित्र व्यंकापा भोसले लिखित ‘शाहू महाराज आणि भटके-विमुक्त’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजर्षी शाहू स्मारक सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते  करण्यात आले.

डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, भटके विमुक्त आणि उच्चवर्णीय मानल्या जाणाऱ्यांची आडनावे, कुळ एक आहेत; पण मनुवादी व्यवस्थेने बरबटलेल्या लेखणीने यांना विभक्त केले. न वाचणारे, बरं बोलणारे महाराष्ट्राचे वक्ते होतात आणि खोटा इतिहास सांगून जाती- जातीत द्वेष निर्माण करतात. त्यामुळे व्यंकाप्पा भोसलेंसारख्या लेखकाचे खरे लेखन वाचणे गरजेचे आहे.

कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, व्यंकाप्पा भोसले यांच्या लेखणीने भटक्या विमुक्तांचे जगने आणि शाहूंचे कार्य हे जनमानसासमोर आले आहे. त्यामुळे बहुजन समाज नेमका कोण, हे समजते आणि ते साऱ्यांनी समजावून घेऊन सामाजिक विचारांचा वारसा जपावा. यावेळी लेखक व्यंकापा भोसलेंनी या पुस्तकाची भूमिका आणि उद्देश सांगितला. श्रीमंत शाहू महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त करून व्यंकाप्पा भोसले यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, लेखक डॉ. अरुण शिंदे, प्रा. सुनील भोसले व सामाजिक चळवळीतील लेखक, विचारवंत, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.