मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला बसलेल्या झटक्याने काँग्रेस सावध झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे अपक्ष दुखावले आहेत. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका विधानपरिषद निवडणुकीत बसू नये म्हणून काँग्रेसने नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.

राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आवश्यक मतांची संख्या नसतानाही भाजप आणि काँग्रेसने जास्तीचा एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक रंगदार अवस्थेत पोहोचली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाचवी जागा खेचून आणून एकमेकांना शह देण्यासाठी भाजप आणि काँग्रेसही समीकरणे जुळवत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेना जात्यात, तर काँग्रेस सुपात होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. यामध्ये भाजपने बाजी मारली तर आगामी पावसाळी अधिवेशनात मआविला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रसंगी अविश्वास ठराव देखील भाजपकडून आणला जाण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. विजयासाठी २७ मते आवश्यक असली, तरीही भाजपला म्हणजे लाड यांच्या विजयासाठी आठ-दहा नव्हे; तर चक्क २२ मते फोडावी लागणार आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपने धनंजय महाडिकांसाठी नऊ-दहा मते फोडली; पण विधानपरिषदेला ते शक्य नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लाड यांच्यासाठी ही निवडणूक अग्निपरीक्षा आहे. त्यामुळे लाड यांना केवळ पक्ष आणि फडणवीस यांच्या चालींवर अवलंबून राहता येणार नाही.

या लढतीत पक्षापेक्षा आपापल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप हे झटत आहेत. त्यामुळे पुन्हा आमदार होऊन भाजपमधील आपले ‘वजन’ कायम ठेवण्यासाठी धडपणाऱ्या लाड यांना पुढचा आठवडा पायाला भिंगरी लागून मते गोळा करावी लागतील. भाईं जगताप यांनीही हक्काच्या मतांसह वैयक्तिक करिष्म्यावरही काही मते फोडण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहेत. निवडणुकीत लाड आणि भाईमधील संघर्ष लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. या निवडणुकीत पाचव्या जागेवर उमेदवार दिल्यानंतर ही जागा जिंकणे सोपे नसल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणताता नाकीनऊ येणार आहे. तरीही या दोन्ही पक्षांच्या भूमिकांमुळे निवडणूक होत आहे.

दुसरीकडे, लाड पुन्हा विधान परिषदेत आलेच; तर ते काही नेत्यांना डोईजड होण्याची भीतीही अनेकांना आहे. या चक्रात फसण्यापेक्षा लाड यांना एकेका मतासाठी स्वपक्षीयांसह अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचे घर, ऑफिसचे उंबरठे गाठावे लागणार आहेत. काँग्रेसची ताकद कमी असली तरी, भाई जगताप हे काही निवडणुकीत कमी पडणार नाहीत.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (१४ जून) काँग्रेस नेते भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. अपक्षांमध्ये जास्त मतं असणाऱ्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केलं जात असल्याचं दिसत आहे. बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार, एमआयएमचे २, समाजवादी पक्षाचे २, प्रहारचे २, शेकापचा १, शेक्रांप १, मनसे १, जनसुराज्य १, रासप १ आणि माकप १ आमदार. अपक्ष आमदारांमध्ये राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, किशोर जोरगेवार, विनोद अग्रवाल, आशिष जैस्वाल, राजेंद्र राऊत, संजय शिंदे, नरेंद्र भोंडेकर, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, प्रकाश आवाडे, रवि राणा, महेश बालदी यांचा समावेश आहे.