सातारा (प्रतिनिधी) : सातारा येथील अफजल खानच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे हिंदू संघटनांनी अफझल खानाची कबरच हटवण्याची मागणी केली आहे. हिंदू संघटनांची ही मागणी मंत्री शंभूराज देसाई यांनी फेटाळून लावली आहे. अफझल खानाच्या कबरीला धक्का पोहोचू देणार नाही, असे शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. कबर सोडून इतर बांधकाम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण काढण्याचे काम सुरू केले आहे. मूळ कबरीला धक्का पोहोचलेला नाही. धक्का पोहोचू देणार नाही, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.

अफझल खानाच्या कबर परिसरात १९ अनधिकृत खोल्या आहेत. ही सर्व अनधिकृत बांधकामी तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. न्यायालयीन निर्णयामुळे महाबळेश्वरला प्रताप गडाच्या पायथ्याशी अफझल खानाची कबर आहे. या कबरीचा ढाचा, त्याच्या बाजूच्या भिंती आणि छत याला हात लावलेला नाही. त्या परिसरातील वऱ्हांडे आणि बांधकाम अनधिकृत आहेत. ते हटवा असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे काम सातारा जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हिंदू संघटनांनी अफझल खानाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. ज्याने आमच्या मंदिरांची विटंबना केली. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, अशा अफझल खानाच्या थडग्याभोवतीचे बांधकाम शिंदे-फडणवीस सरकारने हटवले.

शिवप्रताप दिनी शिंदे-फडणवीस सरकारने प्रताप दाखवला, असे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे. त्यांनी या कारवाईबाबत शिंदे सरकारचे आभारही मानले आहेत. प्रतागडाच्या पायथ्याशी असणारी कबरच काढा, अशी मागणी हिंदू महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने कबर काढली नाही तर हिंदू महासंघ ही कबर हटवेल, असा इशाराही हिंदू महासंघाने दिला आहे.