तासगाव (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध श्री गणपती पंचायतनचा २४३ वा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात झाला. रथोत्सवादिवशी गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासिक दीड दिवसाच्या गणपतीचे अलोट गर्दीत विसर्जन करण्यात आले. 

‘मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात, अलौकिक व नयनरम्य सोहळ्यात हा रथोत्सव पार पडला. ‘मोरया’ च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढत होते. गणपती मंदिर ते समोर अर्धा किमीवर असलेल्या श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिरापर्यंत हा रथ ओढत नेण्यात आला. रथ ओढण्यास सुरवात झाल्यानंतर गुलाल व पेढ्यांची झालेली उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांझपथक, समोर दिमाखात चालणारी ‘गौरी’ हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते.

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर यंदा तासगावात गणेशोत्सवाचा आणि रथोत्सव सोहळ्यात मोठा उत्साह दिसून आला. मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इ. स. १७७९ मध्ये तासगावच्या श्री सिद्धिविनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून ही परंपरा अपवाद वगळता अखंड सुरू आहे.

रथोत्सव सोहळ्यात लाकडी कोरीवकाम केलेला आणि लोखंडी चाके असलेला हा तीनमजली रथ भाविकानी दोरांच्या साहाय्याने ओढला. रथातून आणि रथाबाहेरून लाकडी ओंडक्याच्या सहाय्याने रथावर नियंत्रण ठेव्ठ्यात आले. या रथातून ‘श्री गणेश’ पित्याच्या भेटीसाठी काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत जातात, तेथे आरती होऊन ते पुन्हा मंदिरात परततात, अशी आख्यायिका आहे. रथामध्ये ‘श्रीं’ची पंचधातूची उत्सवमूर्ती आणि मानकरी बसलेले होते. अपूर्व उत्साहात हा रथोत्सव सोहळा पार पडला.