कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला सुरुवात झाली आहे. योजनेची कागदपत्रे सादर करण्याच्या दुसऱ्याच दिवसापासून सेतू चालकांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या योजनेतून लाभार्थी महिलांची लुट केली जात असेल तर त्यांची गय केली जाणार नसल्याचे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

तसेच या योजनेबाबत शहरातील महिलांमध्ये जनजागृती करा. त्याचबरोबर यातील कागदपत्रे, ऑनलाईन फॉर्म याबाबत तहसीलदार, तलाठी आणि शहरातील सेतू केंद्र चालकांची बैठक घेवून नियमानुसारच शुल्क आकारण्याच्या सूचना द्या, अशा सूचनाही राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका येथील बैठकीत दिल्या.

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, योजनेची अंमलबजावणी करताना शहरी भागात थोड्या अडचणी निर्माण होणार आहेत. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून अर्जदार लाभार्थ्याचे सर्व्हेक्षण करावे. शहरातील बचत गट, समाजसेवी संस्थांना या योजनेच्या जागृतीमध्ये सामील करून घ्यावे. सुलभ कागदपत्रांमुळे योजनेचे प्रक्रिया सोपी असली तरीही महिलांचे प्रबोधन करून जास्तीत महिलांना याचा लाभ द्यावा.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ प्रभागांचा विचार करता वॉर्ड ऑफिसर यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. घंटागाडी, फलकांद्वारे या योजनेस प्रसिद्धी द्यावी. सर्व्हेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्याना योजनेच्या अॅपचे पूर्वप्रशिक्षण द्यावे. या योजनेच्या अंमलबजावणीचे मायक्रो प्लानिंग करून, शासन आपल्या दारी योजनेप्रमाणे ही योजनाही शहरी भागात यशस्वी करावी, अशा सूचना दिल्या.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारची ही भावनिक योजना असून यामध्ये माता भगिनींची कोणीही लुट करत असेल तर याद राखा. तसेच अतिरिक्त पैसे घेणाऱ्या सेतू केंद्रांचे लायसन्स तात्काळ रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राजेश क्षीरसागर यांनी दिला.

यावेळी आयुक्त के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पंडित पाटील, कृष्णा पाटील, संजय सरनाईक, निवास कोळी, महिला बालकल्याण अधिकारी प्रिती पाटोळे, आर.के.पाटील, सतीश फप्पे, संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.