कोलंबो (वृत्तसंस्था) : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, शनिवारी दुपारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला आंदोलकांनी घेराव घातला.

काही आंदोलकांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात प्रवेश केला. इतकेच नव्हे तर राष्ट्रपती निवासस्थानी असलेल्या स्वीमिंग पूलमध्ये ते आंघोळीचा आस्वादही घेत असल्याचे काही व्हीडिओ समोर आले आहेत. श्रीलंकेतील विविध भागातून हजारोच्या संख्येने आंदोलक बसेस, रेल्वे आणि ट्रकमधून कोलंबोत दाखल झाले आहेत. आंदोलकांनी थेट राष्ट्रपती निवासस्थानात प्रवेशाचे प्रयत्न केले. यावेळी निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर जमाव पांगला मात्र काही तासांतच पुन्हा जमा झाला.

राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा सुरू ठेवला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. हवेत गोळीबार करण्यात आला. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर सुरूच आहे. या अश्रुधुराचा ५ जणांना त्रास झाल्याचे सांगण्यात आले.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात घुसण्यास सुरुवात केली. यात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी आणि आंदोलकांच्या झटापटीत पोलिसांना घटनास्थळावरून माघार घ्यावी लागली. काही आंदोलक निवासस्थानाच्या मुख्य गेटवर चढून निवासस्थानात घुसले. आंदोलनस्थळी लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे सध्या त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आहेत, की नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. अश्रुधुरामुळे जखमी झालेल्या बऱ्याच लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.