पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील पर्णाल इतिहास संशोधन मंडळ व सुरभि सांस्कृतिक एवं सामाजिक युवा संघटन, आपटी यांच्यावतीने आपटी येथील लोकसंस्कृती आणि इतिहास अभ्यासक प्रा. आनंद गिरी यांच्या ऐतिहासिक लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. डॉ. राजेंद्र पोंदे याच्या अध्यक्षतेखाली झाले.

प्रा. आनंद गिरी हे महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व लोककलावंत यांच्या संशोधन क्षेत्रातील सुपरिचित असे नाव आहे. १९८५ ते २०१६ या काळात प्रसिध्द झालेल्या वर्तमानपत्रातील ऐतिहासिक चरित्रात्मक लेखांचे संकलन पन्हाळा येथील पर्णाल इतिहास मंडळाच्या वतीने करण्यात आले. याचे संपादन शिवप्रसाद शेवाळे यांनी केले. प्रा.गिरी यांच्या गौरवार्थ ‘प्रा. आनंद गिरी यांचे ऐतिहासिक लेख’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून महादजी शिंदे यांच्यापर्यंत मराठेशाहीच्या शूरवीरांचे चरित्राचे पैलू मांडले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक दि. बा. पाटील, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे, शाहीर शहाजी माळी, प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. आनंद गिरी यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शाहीर रंगराव पाटील आणि सहकाऱ्यांनी शाहिरी सादर केली. यावेळी विश्वासराव पाटील, आशीष पाटील, स्वप्नील पाटील, युवराज सूर्यवंशी, रणजित शिपुगडे, संतोष कांदेकर, विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.