वाकरे (प्रतिनिधी) : सांगरूळ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी प्रा. जयंत आसगावकर हे पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांच्या विजयासाठी ताकदीने लढा देण्याचा निर्णय सांगरुळ शिक्षण संस्था संचालक व सेवकांच्या बैठकीत घेण्यात आला. कुडित्रे (ता. करवीर) येथील श्रीराम हायस्कूलमध्ये सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक व सर्व सेवकांची संयुक्त बैठक काल (मंगळवारी) घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे अध्यक्षस्थानी होते.
सांगरूळ शिक्षण संस्थेचे सहसचिव डी. एन. कुलकर्णी यांनी सांगरुळ संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच जयंत आसगावकर यांच्या रूपाने शिक्षण संस्था चालक आणि शिक्षकांना चांगले नेतृत्व लाभले आहे. त्यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी अथक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. जयंत आसगावकर यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदारांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून आतापर्यंत हे प्रयत्न झाले नाहीत अशी खंत व्यक्त केली. आपण स्वतः शिक्षण संस्था सचिव आणि प्राध्यापक असून या दोन्ही घटकांच्या प्रश्नांची आपल्याला जाण असल्याने विधान परिषदेच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न आपण मार्गी लावणार आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक संघटना आपल्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे यांनी आता निवडणुकीतून माघार नाही, म्हणून संस्थेच्या सेवकांनी सर्व शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. या वेळी प्राचार्य डॉ. डी. डी. कुरळपकर, पी. के. पाटील, संजय डी. पाटील, प्राचार्य डी. पी. भगत, सुभाष कलागते, वसंत पाटील, डॉ. जी. जे. फगरे, प्रभारी प्राचार्य ए. के. भगाटे, उपप्राचार्य सी. एन. वाळके, संस्थेचे संचालक आनंदा कासोटे, सदाशिव खाडे, बी. आर. नाळे, डी. जी. खाडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.