पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१४ जून) श्रीक्षेत्र देहू दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. यामुळे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मंदिर परिसरात पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे. 

देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत २२ एकरच्या मैदानात सभा होईल. त्यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी स्क्रीनची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणापासून जवळच तीन हेलिपॅड उभारले आहेत. दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधानांचे आगमन होईल. मोटारीने परंडवाल चौक, मुख्य कमानीमागे ते चौदा टाळकरी कमानीपर्यंत पोहोचतील. तेथून मुख्य मंदिरापर्यंत मंडप उभारला आहे.

या दौऱ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. त्यात १० उपायुक्त,  २० सहाय्यक आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, २९५ सहायक निरीक्षक, २२७० कर्मचारी यासोबतच एसपीजी, एनएसजी, सीआरपीएफ, एसआरपीएफ फोर्स वन पथकही तैनात आहेत. चारशे वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. देहू संस्थानने मार्च महिन्यात मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिले होते. पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू इथे येणार आहेत.