कोल्हापूर (प्रतिनिधी) : गणरायाच्या आगमनादिवशी (बुधवारी) कोल्हापूर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत आवाजाची मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.

ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याबाबत १४ सुटीचे दिवस यापूर्वी घोषित करण्यात आले आहेत. तसेच उर्वरित एक दिवस आवश्यकतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आला असून, यानुसार ही सूट देण्यात आली आहे.

सन २०२२ मध्ये ध्वनी प्रदूषण नियम, २००० च्या नियम ५ (३) नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये करता येईल. तथापि कोणत्याही ध्वनी प्रतिबंधित क्षेत्राच्या परिसरामध्ये या आदेशानुसार कोणतीही सूट राहणार नाही. तसेच ध्वनीक्षेपक लावण्यासाठी पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.