गारगोटी (प्रतिनिधी) : येथील एस.टी. बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम वर्क ऑर्डरप्रमाणे केले नसल्याने या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी करत पतित पावन संघटना कोल्हापूर व भुदरगड तालुक्याच्या वतीने आज (बुधवारी) गारगोटी बसस्थानकाचे प्रवेशद्वारात धरणे आंदोलन करण्यात आले.

गारगोटी एस.टी. बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम १ कोटी २८ लाखाचे गेल्या दोन वर्षांत करण्यात आले आहे. या कामात स्थानकाच्या इमारतीचे रुफकाम, फरशी, संरक्षक भिंत, फूटपाथ आदी कामांचा समावेश होता. ठेकेदाराने हे काम नियमानुसार व वर्क ऑर्डरनुसार केले नाही. या विरोधात पतित पावन संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे दि २९ जुलै रोजी तक्रार केली होती. या कामाशी संबधित अधिकारी व ठेकेदार ३ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार गारगोटी बसस्थानकाच्या पाहणीमध्ये या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या. ठेकेदार काम अर्धवट सोडून पळून गेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या पाहणीसाठी एसटीचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे हे जाणूनबुजून अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांचा बेजबाबदारपणा दिसून आला आहे. वर्क ऑर्डरप्रमाणे काम नसल्यामुळे या कामास राज्य परिवहनचे पुण्यातील कार्यकारी अभियंता कुलकर्णी, विभाग नियंत्रक पलंगे, स्थापत्य विभागीय अभियंता लिंग्रज हे जबाबदार असून, या अधिकाऱ्यांना निलंबित करावे तसेच या कामाचे वालचंद कॉलेज, सांगली किंवा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड या संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट करून ते जनतेसमोर सादर करावे, या मागणीसाठी आज हे धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार कदम, उपजिल्हाध्यक्ष प्रशांत जामदार, दशरथ बागडी, सहसचिव अमोल केंगार, भुदरगड तालुकाप्रमुख सचिन देसाई, कार्याध्यक्ष विनायक पोवार, संपर्कप्रमुख रंगराव पाटील, वैशाली झांजगे, अंकिता हेब्बाळकर आदींनी भाग घेतला.