कोल्हापूर (प्रतिनिधी) : विघ्नाहर्त्या गणेशाचे जल्लोषी स्वागतासाठी करवीर नगरीसह जिल्ह्यात सर्व तयारी होत आली असून, सर्वत्र आगमनाची लगबग सुरु आहे. कोरोना काळातील सर्व विघ्नांवर मात करत बाप्पांच्या आगमनाला पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अवघी करवीर नगरी गणेशमय झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

घरोघरी गणेश आगमनाची तयारी सुरु असून, काही भाविकांनी मंगळवारी दुपारपासूनच मूर्ती नेण्यास सुरुवात केली आहे. गणरायाचे आसन, मखर, मंदिर, बनविण्यात भक्त मग्न आहेत. आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात येत आहे. आनंद, चैतन्य आणि सळसळत्या उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या गणेशोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होत आहे.

सार्वजानिक मंडळांनी देखील सोमवारपासूनच गणरायाच्या आगमनाला प्रारंभ केला आहे. काही मंडळांनी बाप्पाचे  आगमन मिरवणुकीने करण्याची तयारी जोरदार सुरु केली आहे. मंडप, सजावट यासह आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काही मंडळांचे बाप्पा वाजत-गाजत विराजमान झाले आहेत. शिवाजी चौक तरुण मंडळाचा २१ फुटी महागणपाती यंदा पहिल्याच दिवशी दर्शनासाठी खुला होणार आहे.

शहरातील शाहूपुरी, गंगावेस, बापट कॅम्प या परिसरात मोठ्या प्रमाणात लगबग दिसून येत आहे. कुंभारवाडे रात्री उशिरापर्यंत जागत असून, मूर्तींवर अखेरचा हात फिरण्याचे काम सुरु आहे. काही मंडळांनी शाडूच्या मूर्तीना पसंती दिली आहे. बाप्पाला वाजत-गाजत आणण्यासाठी युवावर्गाची धांदल दिसून येत आहे. बाप्पाच्या अनमानची सर्वजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. बाप्पाचा आवडता प्रसाद म्हणजे मोदक आणि खीर यांच्या साहित्य खरेदीसाठी महिलांमध्ये गडबड दिसून येत आहे. सजावट साहित्य, नारळ, सुकामेवा, दुर्वा, विविध रंगीबेरंगी फुले, फळे, अगरबत्ती, कपूर, धूप, बाप्पासाठी चांदीचे दागिने असे विविध साहित्य खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. ठिकठिकाणी खरेदीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.