मुंबई (प्रतिनिधी) : येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये २७ टक्के ओबीसी उमेदवार देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. याबाबत ट्विट करुन त्यांनी माहिती दिली.

पाटील यांनी म्हटले, ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.