कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रिक्षाचालकांना उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा रिक्षाचालकांनी शंभर टक्के लाभ घ्यावा. यापुढेही रिक्षाचालकांचे जे प्रश्न आहेत ते प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही ना. सतेज पाटील यांनी दिली. ते प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित रिक्षाचालक अनुदान ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रशिक्षणावेळी बोलत होते.

राज्य शासनाने रिक्षाचालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १,५०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान परवानाधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज रिक्षाचालकांच्या शासकीय अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी रिक्षाचालक आणि रिक्षा वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.

यावेळी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना मदत व्हावी यासाठी त्यांना अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असल्याचे सांगितले. कोल्हापूरमध्ये सुमारे १५ हजार परवानाधारक रिक्षाचालक आहेत. यांना मदत व्हावी यासाठी हे अनुदान राज्य शासनाकडून दिले जात आहे. यापुढेही रिक्षाचालकांचे जे प्रश्न आहेत ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे सोडवू अशी ग्वाही ना. सतेज पाटील यांनी दिली.

या अनुदानासाठी परवानाधारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज करतांना प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर रिक्षा नंबर, लायसन्स नंबर, बॅंक खात्याला लिंक केलेला आधार नंबर भरणे गरजेचे असल्याचे सांगितले.