कोल्हापूर ( प्रतिनिधी ) केंद्र सरकारच्या योजनेतून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 100 ई-बसेस फेब्रुवारी अखेरीस कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. या ई-बसेससाठी विद्युतीकरणाचा 26 कोटीचा आणि पायाभूत सुविधांसाठी 12 कोटीचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, त्याचा आपण पाठपुरावा करु, असे खासदार महाडिक यांनी बैठकीत स्पष्ट केले.
कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाची आर्थिक स्थिती लक्षात घेवून आणि नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारकडे कोल्हापूर शहरासाठी 100 ई-बसेसची मागणी केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य झाली आहे. या पार्श्वभूमीवर ई -बसेसच्या चार्जिंगसाठी स्वतंत्र विद्युत यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, प्रशासकीय इमारत, कर्मचार्यांसाठी विश्रांती स्थान, पार्किंग व्यवस्था अशा कामांचा समावेश आहे.
विद्युतीकरणाच्या कामासाठी 26 कोटी रुपये खर्च येणार
पुईखडी ते केएमटी वर्कशॉप या साडेआठ किलोमीटर लांबीच्या मार्गावर, 33 केव्ही क्षमतेची स्वतंत्र विद्युत वाहिनी टाकणे गरजेचे आहे. तसेच केएमटी वर्कशॉपमध्ये 3५ चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. अशा विद्युतीकरणाच्या कामासाठी 26 कोटी रुपये खर्च येणार आहे. शिवाय अन्य पायाभूत सुविधांसाठी 12 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. याचा पाठपुरावा करत असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.