कागल, (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाचशेहून अधिक मंदिरांच्या बांधकामामध्ये योगदान दिले आहे. या माध्यमातून त्यांनी धर्मसंस्थेला सदैव पाठबळ दिल्याचे गौरवोद्गार श्री. भक्तीयोग आश्रम हंचनाळ, तारदाळ व  मळणगावचे मठाधिपती प. पू. महेशानंद महास्वामीजी महाराज यांनी काढले. कागलमध्ये कोष्टी गल्लीतील श्री. महादेव मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्यात ते बोलत होते.

येथील कोष्टी गल्लीत हेमाडपंती पद्धतीने बांधलेल्या श्री. महादेव मंदिरामध्ये प. पू. महेशानंद महास्वामीजी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा झाला. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते महाआरती झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प. पू. महेशानंद महास्वामीजी महाराज व मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सजवलेल्या चित्ररथासह भाविकांनी सवाद्य मिरवणूक काढली.

यावेळी प. पू. महेशानंद महास्वामीजी महाराज पुढे म्हणाले, भारत देश ही देव-देवतांच्या मंदिरांची आणि ऋषीमुनींची देवभूमी आहे. या भूमीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. मंदिरांच्या माध्यमातून हा इतिहास पिढ्यानपिढ्या जोपासला जात आहे. अंधश्रद्धा न वाढविता प्रत्येकाने माणसा- माणसात किंबहुना; स्वतःतच देव शोधा, असेही ते म्हणाले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, देव-देवतांची मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने आहेत. मंदिरांमुळे समाजातील एकोपा वाढीस लागून तो टिकतो. हेमाडपंती पद्धतीने बांधलेल्या या दगडी मंदिरामुळे कागल शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवात भर पडली आहे.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष मनोहर पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, ज्येष्ठ पत्रकार अतुल जोशी यांचीही मनोगते झाली. नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी नगराध्यक्षा आशाकाकी माने, नगरसेविका विजयादेवी निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, बाबासाहेब नाईक, आनंदराव पसारे, नितीन दिंडे, आर्किटेक्ट स्वप्निल संकपाळ, कारागीर दुर्गाप्पा वडर, राजू कुराडे आदी उपस्थित होते.

बंडा बारड यांनी स्वागत केले. नगरसेवक प्रवीण काळबर यांनी प्रास्ताविक केले. तर संजय चितारी यांनी आभार मानले.