कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शनिवारी मध्यरात्रीपासून शिरोळ तालुका आणि परिसरात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश माजी राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

शनिवारी रात्री संपूर्ण शिरोळ तालुक्यात ढगफुटीसारखा मोठा पाऊस झाला अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले गावागावांचा संपर्क तुटला या घटनेनंतर आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील काही भागाचा दौरा केला व गावागावातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधत नुकसानीची माहिती घेतली आणि तातडीने तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, कृषी विभागाचे अधिकारी व गटविकास अधिकारी यांना शिरोळ तालुक्यातील झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

अचानक जोरदारपणे आलेल्या या परतीच्या पावसाने शिरोळ तालुक्यातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीबरोबरच रस्ते-भराव वाहून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे करून नुकसानीबाबतचा अहवाल तातडीने राज्य शासनाला देऊन मदत करण्यासंदर्भात शासनाकडे आपण आग्रह धरणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.