पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथे निकमाचा माळ आणि उदाळवाडीतील भैरवनाथ मंदिर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे या परिसरात कोणत्याही नागरिकांनी फिरकू नये. विशेषतः या परिसरातील शेतकऱ्यांनी एकटे न फिरता शेताकडे जाताना खबरदारी घ्यावी. असे आवाहन पन्हाळा वनविभाग आणि वाघवे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

वाघवे परिसर हा पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेला भाग आहे. गावच्या उत्तरेला शेतीजमीनी लागून डोंगराळ, जंगल क्षेत्र लागते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास निकमाचा माळ परिसरात एका शेतकरी कुटुंबाला वाघसदृश प्राणी दिसल्याने वाघवेसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती मिळताच पोलीस पाटील गणेश पोवार आणि ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने वनविभागास कळवले.

यावेळी पन्हाळा वनविभाग आरएफओ प्रियंका दळवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना परिसराची पहाणी करून चौकशी करण्याचे आदेश दिल्याने वनअधिकाऱ्यांनी या परिसरात पहाणी केली. यावेळी या परिसरात बिबट्या सदृश प्राण्यांच्या पायाचे ठसे उटल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे ठसे घेवून तपासणी केली असता बिबट्याचे ठसे असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायत आणि वनविभागाच्या वतीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून हा परिसर दोन दिवस झाले पिंजून काढण्यात आला आहे.

यावेळी सरपंच प्रदिप पाटील,पोलीस पाटील गणेश पोवार, वनरक्षक एम.बी.आंबी, वनपाल विजय दाते, वनसेवक हरी चौगले, रघुनाथ पाटील, आनंदा कांबळे, युवराज विभूते, परवेज म्हालदार उपस्थित होते.